यशस्वी अभ्यासाची दशसूत्री
शैक्षणिक अभ्यासक्रमाची एखादी परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा, कोणत्याही परीक्षेत यश मिळण्यासाठी नियोजन करावं लागतं. जे आपण ठरवतो, त्याची अंमलबजावणीदेखील तेवढ्याच सजगतेने आणि सक्षमपणे करावी लागते. त्यात हलगर्जीपणा झाला की, यश आणखी लांब जातं. त्यामुळे करिअरमध्ये यश मिळवायचे असेल, तर खालील दहा ‘स्टेप्स’चा प्रभावशाली वापर करा –
1.लवकर सुरुवात
“Well begun is half done” लवकर आणि चांगली सुरवात करणं म्हणजेच अर्धी मोहीम फत्ते झाल्यासारखं असतं. त्यामुळेच स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या शाळा-महाविद्यालयापासूनच करणं गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग इ. परीक्षा सोप्या करायच्या असतील, तर इंग्रजीकडे विशेष लक्ष द्या. शिक्षण घेत असताना बातम्या पाहणं व वाचणं महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडणाऱ्या घटनांचा होणारा परिणाम आणि प्रभाव अभ्यासणं आवश्यक आहे. उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, जे कुठल्याही ‘शॉर्टकट’ किंवा ‘फास्ट फॉरवर्ड’ अभ्यास पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे आधीपासूनच चौफेर वाचन ठेवा.
2. ‘बेसिक्स’मध्ये चूक नको
स्पर्धा परीक्षेतील बरेचसे प्रश्न क्रमिक पाठ्यपुस्तकांवर आधारित असतात. म्हणून 5 ते १२ वी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचणं फायद्याचं ठरतं. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे पाया पक्का होतो.संकल्पना स्पष्ट होतात. स्पर्धा परीक्षेतील बरेचसे प्रश्न यावर आधारित असतात.
3. बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान
कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड, विश्लेषण करणं आवश्यक असतं. त्यासाठी पाढे पाठ असणं, वर्ग, घनसंख्या यांचं पाठांतर असल्यास निश्चितच फायदा होतो. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात.सर्वात महत्त्वाचे बुद्धिमत्ता विषयाला सातत्य व सराव असणे गरजेचे असते.
4.गणिताशी करा दोस्ती
गणित हा कठीण वाटणारा विषय मानला जातो, पण स्पर्धा परीक्षेत तो वेगळी कलाटणी मिळवून देऊ शकतो. मात्र, त्यासाठी गणिताचा पाया शालेय जीवनापासूनच पक्का केला पाहिजे.कारण बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. यामध्ये अपूर्णांक ,बैजीक राशी,काळ, काम, वेग, नातेसंबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. कमीत कमी वेळात उत्तरे देण्याची चपळता अंगी असणे गरजेचे आहे. एक गणित ४० सेकंदांच्या आत सोडवायचे असते.
5.इंग्रजीची भीती नको
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम इंग्रजीची भीती मनातून काढून टाका. आपण चुकलो किंवा अडखळलो तरी चालेल, पण इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय ठेवलीच पाहिजे. याची सुरवात कशी करावी? तर, ग्रामरकडे लक्ष द्या. इंग्रजी वर्तमानपत्र वाचा. कालांतराने हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवा. इंग्रजी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रम, बातम्या, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.
6.वेळेचं भान
“जो आज वर्तमानाचा वेळ वाया घालवतो , त्याचा भविष्यकाळ वाया जातो” असं म्हणतात.वेळेच्या सदुपयोगाची सवय आपल्याला जाणीवपूर्वक लावावी लागते. त्यासाठी पहिले पाऊल म्हणजे वक्तशीरपणा! निग्रह आणि सततचा सराव यामुळे हा गुण साध्य होतो. आपण किती झोपतो, किती वाजता उठतो, किती वेळ जागरण करतो, किती वेळ टाइमपास करतो याचा विचार करा. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इ. बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचं नियोजन करा. सोशल मीडिया, मोबाइलचा वापर गरजेपुरता करा.
7.शिस्त
प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळी करणे म्हणजेच शिस्त होय. प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त फार महत्त्वाचे असते. ज्याला वेळेचं भान असतं तो आपल्या सगळ्या गोष्टी शिस्तीत म्हणजेच योग्य वेळेत करतो.
8.सातत्य
जो विषय आपल्याला कठीण वाटतो त्याचा सतत सराव करणे,वाचन करणे गरजेचे असते. बुद्धिमत्ता आणि गणिताच्या सरावात सातत्य असणे ही स्पर्धा परीक्षांची गुरुकिल्ली आहे.
9.हस्ताक्षर
सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असं म्हटलं जातं. मात्र, हा दागिना घडवावा लागतो. आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल, तर केवळ आपलं ज्ञान चौफेर असून भागणार नाही, तर त्याचं सादरीकरणही चांगले हवं. त्यासाठी सुंदर हस्ताक्षर ही पहिली, तर लेखनशैली ही दुसरी पायरी आहे.
10.सर्वांगीण विचार
तीन महत्त्वाच्या बाबी आहेत करिअरशी निगडीत अभ्यास आणि ज्ञान (नॉलेज), करिअरसाठी आवश्यक गुणकौशल्ये (स्किल्स), करिअरला पूरक असा वृत्तीतील बदल (औटट्यूड). याप्रमाणे बदल करावे लागतात. उदा. पोलिस होण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, तंदुरुस्त व चपळ शरीर असावे लागते. सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीसाठी लॉजिक लागते. त्यामुळे जशी कार्यक्षेत्रे बदलतात तशी जीवनपद्धती व वर्तणूक बदलावी लागते.