रक्ताभिसरण संस्था (Blood circulatory system)

रक्ताभिसरण संस्था (Blood circulatory system)

शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचे वहन रक्ताभिसरण संस्था करते. मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश होतो.


हृदय : रचना व कार्ये : छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यांमागे, दोन्ही फुप्फुसांच्यामध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठीएवढा असतो व वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते. आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या दोन थरांमध्ये एक द्रवपदार्थ असतो, त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होते.

मानवी हृदय हा एक स्नायूमय, मांसल अवयव आहे. हृदय हे हृदस्नायूंचे बनलेले असते. हृदय स्नायू अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात. हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे दोन भाग पडतात. या भागांचे परत दोन-दोन कप्पे पडतात. अशा प्रकारे हृदयाचे चार कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालील कप्प्यांना निलय असे म्हणतात.


रक्तवाहिन्या रचना व कार्ये :

हृदयाची स्पंदने सतत चालू असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांत सतत रक्त फिरत राहते. रक्तवाहिन्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत. रोहिणी/धमन्या : हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुप्फुसधमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात.
नीला (शीरा) शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. फुप्फुसशिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती (कार्बनडायऑक्साइड युक्त) रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. यांची भित्तिका पातळ असते. तसेच, यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात.

केशवाहिन्या (केशिका) (Capillaries)

धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात त्यांना केशिका म्हणतात. केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरके व जीवनसत्त्वे पेशींत मिळतात, तर पेशींतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. त्यांनाच आपण शिरा म्हणतो. प्रत्येक अवयवांमध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.
हृदयातील रक्ताभिसरण / हृदयाचे कार्य

हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस ‘रक्ताभिसरण’ म्हणतात रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या एकांतरीत क्रिया घडत असतात. हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो.

माहीत आहे का तुम्हांला ?

सामन्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. व्यायाम वा काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना वा झोपला असताना ते कमी होतात असे आढळून आले आहे. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या जास्त असते.

हृदयाचे ठोके पडत असताना दोन प्रकारचे आवाज येतात. यांतील एका आवाजाचे वर्णन ‘लब्ब’ तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन ‘डब्ब’ असे करतात. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलिलीटर रक्त ढकलते.