परिसंस्था ( Ecosystems )

परिसंस्था

परिसंस्था (Ecosystem) : आपल्या सभोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे. सजीव आणि निर्जिव.

सजीवांना जैविक (Biotic) घटक आणि अजैविक (Abiotic) घटक असे म्हणतात. या सजीव आणि निर्जिव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो. या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते.

परिसंस्थेची रचना (Structure of Ecosystem) : सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज

असते तसेच त्यांची निर्जिव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. एखादया सूक्ष्म जीवाला ऑक्सिजनची गरज असते, तर दुसऱ्याला नसते. काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो तर काही वनस्पती कमी सूर्यप्रकाशात म्हणजेच सावलीत चांगल्या वाढतात.

परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक उदाहरणार्थ, हवा, पाणी, माती. सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. एखादया परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते.

सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होतो. सभोवतालच्या

परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना, कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजाबत असलेली भूमिका याला ‘निश’ (Niche) म्हणतात. उदा. बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करते व मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न व आसरा पुरविते.

बहुतेक परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात आणि त्यामध्ये विविध जीवजातींचे संख्यात्मक व गुणात्मक असे प्रचंड वैविध्य आढळते. आपल्या भारत देशासारख्या उष्णकटिबंधीय भागातील परिसंस्थांमध्ये केवळ काही मोजक्या जातीचे सजीव सर्वत्र मोठ्या संख्येने आढळून येतात. उरलेल्या बहुतेक वनस्पती व प्राण्यांच्या जातीची बरीच कमी संख्या असते. काही जातींमध्ये तर संख्या फारच कमी असते. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगवेगळी असते. उदा. जंगल, तळे, सागर, नदी इत्यादी परिसंस्थेचा आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती व प्राणीप्रकार या वैशिष्ट्यांनुसार परिसंस्थांचे काही प्रकार आहेत.
जीवावरणात अनेक परिसंस्था कार्यान्वित असतात. त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते. पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळ मानाने स्वतंत्र व वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या त्या एकमेकांशी बांधीलच असतात. यामुळे या छोट्या-छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही, परंतु वैशिष्ट्यानुसार त्यांच्या कार्यप्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात.
पृथ्वीवरील काही भागांत बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना ‘बायोम्स’ (Bi-omes) असे म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या ‘बायोम्स’ आढळतात., 1. भू-परिसंस्था (Land Biomes) व 2. जलीय परिसंस्था (Aquatic Biomes)

भू-परिसंस्था : ज्या परिसंस्था फक्त भू-भागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भू-परिसंस्था असे म्हणतात. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. उदा. गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था.

अ. गवताळ प्रदेशातील परिसंस्था (Grassland Ecosystem) : ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढविण्यासाठी पुरेसे नसते, त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. या प्रकारच्या परिसंस्थामध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यांमुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक व सूक्ष्मजीवसुद्धा असतात.

ब. जंगलातील परिसंस्था (Forest Ecosystem)

ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष, एकाच ठिकाणी असतात. अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात.

जलीय परिसंस्था (Aquatic Biomes) : पृथ्वीवर

71 % भूभाग पाण्याने व्यापला असून फक्त 29% भागावर जमीन आहे. त्यामुळे जलीय परिसंस्थांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नैसर्गिक परिसंस्थेत जलपरिसंस्था अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे. जलपरिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्त्वाचे मानले जातात. उदा. गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, खाडी परिसंस्था.

अ. गोड्या पाण्यातील परिसंस्था : या परिसंस्थेत नदी, तळे, सरोवर यांचा समावेश होतो. या परिसंस्थेत नदीद्वारे व

पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते. जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. ते वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून त्याचे अजैविक घटकांत रूपांतर करतात.

ब. खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था (Marine Ecosystem) : या परिसंस्थेत सागरी वनस्पतींची वाढ होते. शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे, झिंगे मोठ्या प्रमाणात उथळ भागात आढळतात. सागराच्या मध्यभागी कमी प्रमाणात जलचर आढळतात. मोठे मासे हे द्वितीयक भक्षक असतात. समुद्रात पोषकद्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. सागर तळावर विघटकांची संख्या जास्त असते. मृत वनस्पती, मृती प्राणी व टाकाऊ पदार्थ सागर तळावर जमा होऊन त्यांच्यावर सूक्ष्मजीवाणू विघटनाचे कार्य करत असतात.

मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास : मानवाच्या

विविध कृतींचा परिसंस्थांच्या कार्यावर घातक परिणाम होतो, त्यामुळे परिसंस्थाचा ऱ्हास होतो. उदा. खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यांमुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. तसेच त्यामुळे सजीव आणि निर्जिव घटकांचे संबंधही बिघडतात.

विविध मानवी प्रक्रिया व कृती, परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यापासून ‘ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होतात.

परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती, लोकसंख्यावाढ व संसाधनाचा वाढलेला वापर परिसंस्थेमध्ये मानवप्राणी ‘भक्षक’

या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्यावाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली त्यामुळे परिसंस्थावर ताण वाढला पण टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले.

शहरीकरण : वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो आहे. यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात.

औद्योगिकीकरण आणि वाहतूक : वाढत्या औ‌द्योगिकीकरणासाठी लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. यामुळे जंगलांचा नाश होतो. वाहतुकीत वाढ झाल्याने त्यासाठीच्या सुविधा वाढवताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जागांवर रस्त्यांचे, रेल्वेमार्गांचे जाळे पसरले जाते.

पर्यटन : निसर्गनिरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकांकरिता अशा ठिकाणाच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर हानी होते.

मोठी धरणे : धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणांमुळे नदीचा खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात.

युद्धे : जमीन, पाणी, खनिजसंपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदांतून युद्ध होते. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बाँबवर्षाव सुरुंग स्फोट केले जातात. यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही, तर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्टसुद्धा होतात.

अशा प्रकारे भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थांत रूपांतर होते, काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो, तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात.

नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते.